विद्यापीठाच्या पदवी,पदव्युत्तर परिक्षांना 17 मार्चपासून सुरूवात

Foto
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांची पदवी परीक्षा 17 मार्चपासून सुरू होणार आहे. तर पदव्युत्तर परीक्षा 31 मार्चपासून सुरू होणार आहे. पदवी परीक्षेसाठी औरंगाबाद शहराचे चार ’झोन’ निश्चित करण्यात आले आहेत.
विद्यापीठाने पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेची तयारी सुरू केली आहे. येत्या 17 मार्चपासून पदवी वर्गाची परीक्षा सुरू होणार आहे. चार जिल्ह्यातील 223 परीक्षा केंद्रावर परीक्षा होईल. त्यासाठी परीक्षा विभागाने केंद्रप्रमुख, सहकेंद्रप्रमुख यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. कॉपीचे गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथक स्थापन केले आहे. औरंगाबाद शहरात परीक्षा केंद्र दूर असल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होते. शहराचे विभाग निश्चित करून त्या परिसरातील महाविद्यालये त्यात समाविष्ट करून परीक्षा केंद्र निश्चित करण्याची विद्यार्थ्यांची मागणी होती. त्यानुसार शहराचे चार झोन निश्चित केले आहेत. विद्यापीठ परिसर, औरंगपुरा, मौलाना आझाद महाविद्यालय परिसर आणि सिडको परिसराचा त्यात समावेश आहे. संबंधित झोननुसार विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र निश्चित होणार आहेत. महाविद्यालयात प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहेत. विद्यापीठ प्रशासनाने परीक्षा शुल्क स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पदव्युत्तर परीक्षा 31 मार्चपासून सुरू होणार आहे. या परीक्षेसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक एप्रिल महिन्यात असल्याने काही कर्मचारी निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नियोजित वेळापत्रकापेक्षा लवकर परीक्षा घेण्यात येत आहे. विद्यापीठातील पदव्युत्तर परीक्षा विभाग आपल्या नियोजनानुसार परीक्षा घेणार आहे.  दरम्यान, बुलडाणा आणि जळगाव जिल्ह्याच्या हद्दीलगत असलेल्या परीक्षा केंद्रात सर्वाधिक कॉपीचे प्रकार घडतात. उस्मानाबाद जिल्ह्यातील अतिदुर्गम परीक्षा केंद्रापर्यंत भरारी पथक पोहचू शकत नाही. त्यामुळे कॉपी रोखण्यात विद्यापीठ प्रशासन दरवर्षी अपयशी ठरते. सीसीटीव्हीच्या निगराणीखाली परीक्षा घेण्यात येईल, अशी घोषणा वारंवार करण्यात आली. प्रत्यक्षात अंमलबजावणी नसल्यामुळे कॉपीचा सुळसुळाट वाढला आहे. भरारी पथक कॉपीला आळा घालणार असल्याचा दावा परीक्षा विभागाने केला आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker